फुटीर खासदारांविरोधात सेना उबाठा आक्रमक; धुळ्यात जोरदार घोषणाबाजी करत नोंदवला निषेध
धुळे: शिवसेना उबाठा पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊनही पक्षाशी गद्दारी करणाऱ्या सहा खासदारांविरोधात राज्यभरातील उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप दाटला आहे. धुळ्यातही याचे तीव्र पडसाद पाहायला मिळाले असून, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निषेध नोंदवला.
धुळ्यातील जुन्या महानगरपालिकेजवळील चौकात शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी फुटीर खासदारांच्या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला. लोकशाहीची नीतिमूल्ये पायी तुडवून पक्षाशी बेईमानी करणाऱ्या या खासदारांविरोधात करण्यात आलेल्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
"सत्तेच्या सारीपाटात कोट्यवधी रुपये घेऊन पक्षाशी गद्दारी करणाऱ्या या सहा फुटीर खासदारांनी त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांचा घोर अपमान केला आहे," असा संतप्त आरोप आंदोलकांनी यावेळी केला. तसेच, राज्यातील या फोडाफोडीच्या राजकारणाला पूर्णपणे जबाबदार असणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या प्रमुखांविरोधातही शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी "या फुटीर खासदारांचे करायचे काय, खाली डोके वर पाय" अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
आंदोलनातील प्रमुख उपस्थिती:
या निषेध आंदोलनाप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, तेजस गोटे, संदीप सूर्यवंशी, शेखर वाघ, हेमराज पाटील, बाबाजी पाटील, कुणाल कानकाटे, डॉ. अनिल पाटील, एड. भूषण पाटील, सुनील पाटील, अण्णा फुलपगारे, मुन्ना पठाण, प्रशांत भामरे, सुभाष मराठे, आबा भडांगे, पंकज भारस्कर, महिला आघाडीच्या संगीता जोशी, जयश्री वानखेडे, मयुरी सोनवणे, दिनेश पाटील, मोहन मोरे, मनोज वाल्हे, मनोज बंब, महादू गवळी, संदीप चौधरी, सुरज भावसार, बाळू शेंडगे, गजेंद्र पाटील, सुनील चौधरी, सागर निकम, सागर साळवे, नितीन देशमुख, गौरव पाटील, नाना पाटील, गोकुळ बडगुजर, शुभम मतकर, पिंटू सूर्यवंशी, मुकेश भोकरे, वैभव पाटील, इशतियाक अन्सारी, संजय पाटील, प्रवीण राणा, दीपक भोई, रवी मोरे, हर्षल वाणी, सचिन शिंदे, गुलाब धोबी, राजू पाटील आणि तेजस सपकाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments