मी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातच राहणार असून उद्या पक्षाने आदेश दिला तर ओमराजेंविरोधात लढायला मी तयार असल्याचे सांगत नंदू राजे निंबाळकर यांनी ओमराजे निंबाळकरांविरोधात शड्डू
धाराशिव : निष्ठा म्हणजे काय, याची गोष्ट सांगताना गद्दारांनी ५० खोके घेतले, असे अत्यंत आवेशात सांगणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही विकासनिधीचे तुणतुणे वाजवून मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेत प्रवेश केला. जून २०२२ ला शिवसेनेत पहिली मोठी फूट पडली, त्यानंतर बरोबर चार वर्षांनी २२ जून २०२६ रोजी सहा खासदारांनी आपली भूमिका बदलून एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. मतदारसंघाचा विकास, त्यासाठी लागणारा निधी कमी पडत असल्याने सत्तापक्षात जात असल्याचे एकमुखाने सहा खासदारांनी सांगितले. या सगळ्यात सर्वाधिक चर्चा झाली ती धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची. कारण जिवंत असेपर्यंत उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती. तीच शपथ पायदळी तुडवून त्यांनी शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र 'ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी असतात', अशी मराठीत म्हण आहे. आता ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात त्यांच्याच घरातल्या व्यक्तीने शड्डू ठोकलाय! ओमराजे निंबाळकर यांचे बंधू नंदू राजे निंबाळकर यांनी ओमराजे निंबाळकर यांची साथ सोडून ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाकरे गटाचे निष्ठावंत खासदार ओमराजे निंबाळकर यांना शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसला असून धाराशिव शहराचे माजी नगराध्यक्ष आणि ओमराजे निंबाळकर यांचे बंधू नंदू राजे निंबाळकर हे भावाच्या भूमिकेवर नाराज झाले आहेत. ओमराजेंनी हा निर्णय का घेतला? त्यांचा निर्णय माझ्या मनाला पटत नसून मी ओमराजे निंबाळकर यांची साथ सोडत असल्याचे नंदूराजेंनी स्पष्ट केले आहे.

0 Comments