हजारो धुळेकरांनी सामूहिक योगा करत दिला आरोग्याचा संदेश!

 हजारो धुळेकरांनी सामूहिक योगा करत दिला आरोग्याचा संदेश!





धुळे (प्रतिनिधी):

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून धुळे शहरातील ऐतिहासिक गरुड मैदानावर सामूहिक योग साधना कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो धुळेकरांनी एकत्र येत विविध योगासने करत 'फिटनेस'चा महामंत्र दिला.

पंतप्रधान मोदींमुळे योगाला जागतिक प्रतिष्ठा

कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार अनूप अग्रवाल म्हणाले की, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि प्रयत्नांमुळे योगाचे महत्त्व आज संपूर्ण जगाला पटले आहे. यामुळेच योग दिवस आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यांनी उपस्थित सर्व नागरिकांना योग दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

उद्या 'नीट' परीक्षा म्हणून आजच सारे 'फिट'!

दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. परंतु, यंदा २१ जून रोजी रविवार असून याच दिवशी महत्त्वाची 'नीट' (NEET) परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेमुळे विद्यार्थी मानसिक दडपणाखाली असू नयेत आणि त्यांच्या आरोग्याला प्राधान्य मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासन व योग दिन आयोजन समितीने एक पाऊल पुढे टाकत शनिवारी (२० जून) सकाळी ६:३० वाजता या सर्वसमावेशक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भावी डॉक्टरांना परीक्षेपूर्वी मानसिक शांतता आणि ऊर्जा मिळावी, हाच यामागचा मुख्य उद्देश होता.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाची सुरुवात आमदार अनूप अग्रवाल, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त नितीन कापडनीस, महापौर मायदेवी परदेशी, भाजप नेते गोविंद अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, डॉ. सुभाष भामरे, क्रीडा अधिकारी मनोहर पाटील व विजयसिंह सिसोदीया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.

विविध योगासनांचे प्रात्यक्षिक

या शिबिरात अबालवृद्धांसह सुमारे चार हजार नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला, ज्यामध्ये महिला आणि विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. उपस्थितांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पद्मासन, भुजंगासन, ताडासन, वृक्षासन, अनुलोम-विलोम आणि प्राणायाम यांसारखी विविध योगासने केली. डॉ. राजेंद्र निकुंभ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी योगासनांचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर करत त्याचे आरोग्यासाठी असणारे महत्त्व पटवून दिले.

नियोजन आणि सांगता

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंप्रकाश खंडेलवाल यांनी केले, तर सूत्रसंचालन अमित गोराणे यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी योग दिन आयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी, विविध सामाजिक संस्थांनी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता उपस्थितांना अल्पोपहार वाटप करून करण्यात आली.

Post a Comment

0 Comments