अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक मोहिमेचा दणका
आता मुंबईतील भेसळखोर व्यापाऱ्यांवर बसला आहे.मुंबईतील गिरगाव आणि कुंभारवाडा परिसरात एफडीएच्या पथकाने धाड टाकून तब्बल १,३२८ किलो संशयित भेसळयुक्त मिठाई आणि मावा जप्त केला आहे. अस्वच्छ परिस्थितीत मिठाई आणि माव्याची साठवणूक करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली असून, आरोग्याशी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.एफडीएच्या कडक धोरणामुळे भेसळखोरांमध्ये इतकी दहशत आहे की, कारवाईच्या भीतीने आता ते थेट रस्त्यावर उतरले आहेत! तळोजा परिसरात भुयारी मार्गाजवळ मेट्रो पुलाखाली कुणीतरी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खवा, चीज, दूध आणि इडलीची पाकिटे उघड्यावर फेकून दिल्याचे समोर आले आहे.ही पाकिटे उघड्यावर फेकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सुरू असलेली ही मोहीम भविष्यातही अशीच तीव्र राहणार आहे.

0 Comments