नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट'! ७ जुलै रोजी शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Nashik Rain Red Alert: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अत्यंत गंभीर इशाऱ्यानंतर नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. संभाव्य ढगफुटीसदृश पाऊस आणि पूरस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत ७ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यातील प्रमुख तालुक्यांमध्ये सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांना शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.
पर्यटनस्थळे, धबधबे आणि घाटांवर बंदी
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, वणी (सप्तशृंगी) या धार्मिक स्थळांसह सर्व धबधबे, ट्रेकिंग पॉईंट्स, नदीकाठ आणि पूरप्रवण पर्यटन क्षेत्रांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंदी घातली आहे. या ठिकाणी पोलीस आणि वन विभागातर्फे बॅरिकेडिंग केले जात आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, जत्रा आणि मोठ्या सार्वजनिक गर्दीच्या कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि नदी, नाले, पूल किंवा डोंगराळ भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे

0 Comments