लोकशाही पद्धतीने वंचित बहुजन आघाडीची प्रदेश कार्यकारिणी निवड; राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष
मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीची निवडणूक लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरद्वारे पार पडली. पक्षाच्या कार्यकर्ते आणि सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होत नवीन प्रदेशाध्यक्ष तसेच प्रदेश कार्यकारिणीची निवड केली.
या निवडणुकीत राजेंद्र पातोडे यांची वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर प्रदेश कार्यकारिणीवर सुजात आंबेडकर, अरुण जाधव, इंजि. प्रशांत इंगोले, जितरत्न पटाईत, डॉ. चित्रा कुऱ्हे, दिपक डोके, नागोराव पांचाळ, सर्वजित बनसोडे, कृष्णा देशमुख, सारंग थोरात, ज्ञानेश्वर कवठेकर आणि उत्तम वनशिव यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
बॅलेट पेपरद्वारे झालेल्या या निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्ते आणि सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संघटनेतील पदाधिकाऱ्यांची निवड लोकशाही प्रक्रियेतून करण्याच्या या पद्धतीमुळे पक्षाच्या अंतर्गत लोकशाही प्रक्रियेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
नव्याने निवडून आलेल्या प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणीसमोर राज्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, पक्षाचा जनाधार वाढवणे तसेच बहुजन समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचे आव्हान असणार आहे.
दरम्यान, राजेंद्र पातोडे यांच्यासह नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक वाटचाल अधिक गतिमान होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.

0 Comments