पहाटे झोपेतच आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश; तिघींचा मृत्यू


 पहाटे झोपेतच आश्रमशाळेतील सहा विद्यार्थिनींना सर्पदंश; तिघींचा मृत्यू

धानेोरा (गडचिरोली) : आदिवासी दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील एका अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत हृदयद्रावक घटना घडली. पहाटे झोपेत असताना सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याची घटना समोर आली. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थिनींपैकी तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा तालुक्यातील अप्पलपल्ली येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत सोमवारी पहाटे विद्यार्थिनी झोपेत असताना सर्पदंशाची घटना घडली. सर्पदंश झाल्यानंतर विद्यार्थिनींना तातडीने धानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दीपिका लडका (वय १२) हिचा मृत्यू झाला.

त्यानंतर गंभीर प्रकृती असलेल्या सुमिता मंडळ (वय १४) आणि अनु कोरटी (वय ८) यांना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. दीपिका लडका, सुमिता मंडळ आणि अनु कोरटी या तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूने आश्रमशाळा परिसरात शोककळा पसरली आहे.

घटनेनंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली असून, विद्यार्थिनींना सर्पदंश नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, आश्रमशाळेतील निवास व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये काही त्रुटी होत्या का, याची चौकशी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जखमी विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी हलविण्याबाबतही प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आले. या घटनेमुळे आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Post a Comment

0 Comments