हिसवळ बुद्रुकमध्ये हायमॅक्स दिवे बंद; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर!

 🚨 हिसवळ बुद्रुकमध्ये हायमॅक्स दिवे बंद; नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर!



नांदगाव तालुक्यातील भालूर गटातील हिसवळ बुद्रुक गावातील एससी/एसटी वस्ती तसेच इतर ठिकाणी बसविण्यात आलेले हायमॅक्स दिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत.

पावसाळ्यामुळे परिसरात गवत व काटेरी झुडपे वाढली असून अंधारामुळे रात्रीच्या वेळी साप, विंचू यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका वाढला आहे. लहान मुले, महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन सर्व बंद हायमॅक्स दिवे सुरू करावेत, सोलर यंत्रणा व बॅटरीची तपासणी करून तातडीने दुरुस्ती करावी आणि दिवे नियमित सुरू राहतील याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.

या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी नांदगाव तालुक्याच्या वतीने नांदगाव तालुका अध्यक्ष कपिल तेलुरे यांनी हिसवळ बुद्रुकचे सरपंच  शांताराम पवार यांना निवेदन दिले.

यावेळी तालुका महासचिव श्रावण भाऊ पवार, तालुका उपाध्यक्ष अमोल भाऊ बेंडके, बाळूभाऊ ठाकरे, प्रकाश भाऊ माळी, बाळनाथ पवार, पप्पू भाऊ पवार व गोरख भाऊ पवार उपस्थित होते.

नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता ग्रामपंचायतीने तातडीने कार्यवाही करून बंद हायमॅक्स दिवे सुरू करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments