Shalarth ID Scam dhule : बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील तक्रारदारावर हल्ला
Dhule crime news: देसले यांनी बनावट शालार्थ आयडी प्रकरणात तक्रार केली असून या संदर्भात त्यांचा पाठपुरावा सुरू आहे
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील माळीच गावात जमावाने घरात शिरून महेंद्र देसले या व्यक्तीच्या परिवारावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही मारहाण बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचा पाठपुरावा व तक्रार केल्यामुळे झाल्याचा आरोप होतो आहे. दरम्यान तक्रार करून देखील नरडाणा पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप देसले परिवाराने केला असून आता पोलिसांच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष लागून आहे.
बनावट शालार्थ आयडी प्रकरणामुळे राज्यातील शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक उपसंचालक कार्यालय (नाशिक विभाग), अंतर्गत येणाऱ्या नाशिक, जळगांव, धुळे, नंदुरबार येथील ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोणतेही वैयक्तिक मान्यता व शालार्थ प्रस्ताव नसतांना मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवुन बनावट शालार्थ आदेशाच्या आधारे शालार्थ प्रणालीत शालार्थ ड्राफ्ट भरुन घेवुन वेतन व थकबाकी रक्कम प्राप्त करून घेवुन शासनाची १६० कोटींची आर्थिक फसवणुक केली. म्हणुन संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधिक्षक व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याच्या तपासात अद्याप पावेतो सुमारे १२०० आरोपी निष्पन्न झाले आहेत. या प्रकरणात नासिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून स्वतंत्र एसआयटी याचा तपास करते आहे. धुळे शहरातून यापूर्वी शिक्षण विभागातील दोघा बड्या माशांना अटक करण्यात आली आहे. तर अजूनही अनेकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. अशात शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथे राहणाऱ्या महेंद्र देसले यांच्या वर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
देसले यांनी बनावट शालार्थ आयडी प्रकरणात तक्रार केली असून या संदर्भात त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. यातूनच हा हल्ला झाल्याचा आरोप देसले यांनी केला आहे. दरम्यान हल्ला होत असतानाचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून देसले यांनी देखील या प्रकरणात संबंधितांवर आरोप केले असून तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात नरडाणा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन देखील अजूनही गुन्हा दाखल झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

0 Comments