धुळे हादरले : गर्भवतीला जंगलात नेऊन पेट्रोल टाकून जिवंत जाळले; क्रूर हत्याकांडाने खळबळ
गर्भवती महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्यात आले आणि तिच्यासह पोटातील अर्भकाचाही खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालातून प्रथमदर्शनी उघडकीस आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात सफराज उर्फ शफीक अलीम मोमीन (३८, रा. गांधीनगर, कळंब, जि. धाराशिव), आरिफ उर्फ खुज्या आसिफ शेख (३१, रा. इंदिरानगर, हावरगाव रोड, कळंब), स्वाती उर्फ आरती गणेश कुऱ्हाडे (२८, रा. सप्तसूर कला केंद्र कॉलनी, जामखेड, जि. अहमदनगर) आणि लक्ष्मी बालाजी पवार (३०, रा. बसस्थानक डेपोच्या पाठीमागे, कळंब, जि. धाराशिव) यांना आज (दि.२६) सायंकाळी अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सफराज मोमीन याच्याविरुद्ध धाराशिव व बीड जिल्ह्यांत यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
यासंदर्भात उपलब्ध माहीतीनुसार, २२ सप्टेंबर रोजी डायल ११२ वरून गरताडबारी, (ता.धुळे) परिसरात जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह पडल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहाडी नगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अंदाजे १८ ते ३० वर्षे वयोगटातील महिलेचा पूर्णतः जळालेला मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन अहवालात संबंधित महिला गर्भवती असल्याचे आणि तिच्यासह गर्भातील अर्भकाचाही मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले.

0 Comments