शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष पाहणी; पंचनामे व आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना सूचना
डोंगराळे, ता. मालेगाव | २७ सप्टेंबर २०२६
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी रविवारी दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी सदा कन्हैयालाल कर्णल यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पिकांची तसेच शेतीतील सद्यस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार मालेगाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून लागू करण्यात आलेल्या विविध उपाययोजना व सवलतींची माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांना दिली.
पिकांचे नुकसान, पावसातील खंड आणि शेतीसमोरील अडचणींचा आढावा घेताना पीक परिस्थितीचे सर्वेक्षण, पंचनामे तसेच आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.
दुष्काळी परिस्थितीत जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, कृषी पंपांच्या वीज बिलाबाबत सवलती, रोजगार हमीची कामे तसेच आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी उपाययोजना शासनाकडून करण्यात येत आहेत.
“संकट कितीही मोठे असले तरी शेतकरी बांधवांनी काळजी करू नये. या कठीण परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील,” असे मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
यावेळी प्रकाश पाटील, मनोहर ठाकरे, डिगा परदेशी, सुभाष नंदन यांच्यासह शेतकरी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.


0 Comments