दोंडाईचा परिसरात रुग्णवाहिका सेवा वेळेत उपलब्ध करा
प्रशिक्षित डॉक्टरांसह अतिरिक्त ॲम्बुलन्स तैनात करण्याची आदिवासी टायगर सेनेची मागणी
दोंडाईचा | प्रतिनिधी
दोंडाईचा शहर व परिसरातील ग्रामीण भागात आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारींची दखल घेऊन रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम करण्याची मागणी आदिवासी टायगर सेना, दोंडाईचा यांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, तहसीलदार/अपर तहसीलदार, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच १०८/१०२ रुग्णवाहिका सेवेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
दोंडाईचा शहरासह परिसरातील ग्रामीण भाग मोठा असून गरीब व आदिवासी नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, आपत्कालीन कॉल केल्यानंतरही काही वेळा रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी संघटनेने मांडल्या आहेत.
रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब झाल्यास गंभीर रुग्ण, अपघातग्रस्त तसेच गरोदर महिलांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच दोंडाईचा येथून धुळे किंवा अन्य मोठ्या रुग्णालयात रुग्णांना रेफर करताना रुग्णवाहिकेत प्रशिक्षित डॉक्टर किंवा आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
प्रमुख मागण्या
- आपत्कालीन कॉल मिळताच रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी.
- रुग्णवाहिकेत प्रशिक्षित डॉक्टर अथवा आवश्यक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता सुनिश्चित करावी.
- दोंडाईचा शहर व परिसराची गरज लक्षात घेऊन अतिरिक्त सुसज्ज रुग्णवाहिका कायमस्वरूपी तैनात करावी.
- १०८/१०२ रुग्णवाहिका सेवेच्या कामकाजावर संबंधित AM व DM अधिकाऱ्यांनी नियमित देखरेख ठेवावी.
- रुग्णवाहिका सेवा देण्याच्या प्रतिसाद वेळेचे नियमित परीक्षण करून आवश्यक सुधारणा कराव्यात.
नागरिकांच्या आरोग्याचा आणि जीविताचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आदिवासी टायगर सेनेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी कृष्णा मालचे वणी, ग्रामपंचायत सदस्य तथा शहर अध्यक्ष, विशाल सोनवणे, अजय बागुल, सागर मालचे तसेच आदिवासी टायगर सेनेचे शहरातील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


0 Comments