ठाण्यात उद्धवसेनेच्या विभागप्रमुखाची गोळ्या झाडून हत्या; माजी महापौरांच्या पतीवर कुटुंबीयांचा गंभीर आरोप
ठाणे: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मानपाडा परिसरातील त्यांच्या कार्यालयात गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली असून, राजकीय वातावरण तापले आहे. या हत्याप्रकरणी पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.
कार्यालयात घुसून गोळीबार:
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप पूर्णेकर मानपाडा परिसरातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात असताना त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. यात गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात चेहऱ्याला रुमाल बांधलेले दोन हल्लेखोर दुचाकीवरून पूर्णेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने जाताना दिसत आहेत.
कुटुंबीयांचे गंभीर आरोप आणि अंत्यसंस्कारास नकार:
या घटनेनंतर पूर्णेकर कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनी यापूर्वीही माझ्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांनीच बैठक घेऊन या हत्येचा कट रचला आहे.
गणेशोत्सवापासूनच मारेकरी रेकी करत होते."
जोपर्यंत मुख्य सूत्रधार आणि प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या सर्व हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोपर्यंत प्रदीप पूर्णेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ठाम भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.
पोलिसांचा तपास आणि ५ जणांवर संशय:
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, या हत्येमध्ये निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजिया आणि आणखी एक अशा एकूण पाच जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे.
हत्या राजकीय वैमनस्यातून झाली की यामागे दुसरे काही कारण आहे, याचा सखोल तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. मात्र या घटनेमुळे ठाण्यातील कायदा व सुव्यवस्थेवर आणि राजकीय सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

0 Comments