मुंबईच्या शिवाजी पार्क मैदान परिसरात आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलनाचं आयोजन करणारे आयोजक आणि इतर 400 ते 500 अज्ञात सीजेपी समर्थकांविरोधात शिवाजी पार्क ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनापरवाना बेकायदेशीर जमा जमावणे, लाउडस्पीकरचा वापर, गर्दी जमवून घोषणाबाजी करणे, वाहतुकीला अडथळा तसेच पोलीस आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीनुसार शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान गेट नंबर 6, मीनाताई ठाकरे स्मारकासमोर आंदोलन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.
यात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेसह आशुतोष रांका, सौरभ दास, अजिंक्य शिंदे, प्रणय अहिरे, आफरीन नवाज, पीएसयुच्या सौम्या कोरडे, अंकित भारद्वाज, विजय मलंगी, योगेश इंगळे व इतर अनोळखी 400 ते 500 सीजेपी समर्थक आंदोलकांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 189 आणि 223 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 37(1), 37(3) आणि 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. शिवाजी पार्क पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर सीजेपी संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया नोंदवली.
ते म्हणाले, "आणखी गुन्हे दाखल करा, पण लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढा सुरूच ठेवू!"
'दिल्ली पोलिसांनी अमित शाह यांच्या माणसांप्रमाणे वागू नये'; अभिजीत दिपकेंची टीका
जंतरमंतरवर कालप्रमाणे आजही (3 ऑक्टोबर) सकाळपासूनच आंदोलकांनी जमण्यास सुरुवात केली होती. मात्र, जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईवरून अभिजीत दिपकेंनी दिल्ली पोलिसांवर टीका केली आहे.
"दिल्ली पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या माणसांप्रमाणे काम करणे बंद करावे", असे दिपके म्हणाले.

0 Comments