अकोल्यातील धम्म मेळाव्यात लाखोंचा जनसागर; दुष्काळी मदतीची आकडेवारी दिवाळीपूर्वी जाहीर करा – ॲड. प्रकाश आंबेडकर
अकोला : अकोल्यात गेल्या ४२ वर्षांपासून अखंडपणे आयोजित करण्यात येणाऱ्या धम्म मेळाव्याला यंदा लाखोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहिला. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शेतकऱ्यांची दुष्काळी परिस्थिती, सरकारचे धोरण, जातीव्यवस्था, सामाजिक समता आणि देशातील लोकशाही यांसह विविध विषयांवर परखड भूमिका मांडली. दिवाळीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीची आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्या
राज्य सरकार कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करत असताना दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, असा सवाल ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केला. केंद्र सरकार महाराष्ट्राकडून मोठ्या प्रमाणावर कर गोळा करते; मात्र दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नसल्याची टीका त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. केवळ पाच हजार रुपयांची मदत देऊन प्रश्न सुटणार नाही. सोयाबीनचे पीक हातचे गेले असून कापसाचे उत्पादनही घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ निवारणासाठी केलेल्या उपाययोजनांचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली. पाणी जपून वापरण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.
जातीअंतासाठी स्वतंत्र राजकारणाची गरज
धम्म मेळाव्यात बोलताना ॲड. आंबेडकर यांनी सम्राट अशोक, बौद्ध धम्म आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ दिला. समता, व्यक्तिस्वातंत्र्य आणि सामाजिक प्रतिष्ठा प्रस्थापित करण्यासाठी बौद्ध धम्माचा मार्ग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. जातीव्यवस्थेचा अंत झाल्याशिवाय देशातील स्वातंत्र्य आणि लोकशाही अधिक मजबूत होऊ शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक भूमिकेवर टीका करताना त्यांनी दोन्ही पक्षांनी जातीव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी नेमका कोणता मार्ग स्वीकारला आहे, याचा खुलासा करावा, असे आव्हान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करणाऱ्या नेत्यांनी जातीअंताच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडावी. वंचित घटकांच्या हक्कांसाठी स्वतंत्र राजकीय भूमिका घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
मतदानाच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा आरोप
लोकशाहीत मतदान हा व्यक्तिस्वातंत्र्य व्यक्त करण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, आज मतदानाच्या अधिकारावर घाला घातला जात असल्याची चिंता ॲड. आंबेडकर यांनी व्यक्त केली. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेमुळे महाराष्ट्रातील दोन कोटी मतदारांची नावे वगळली जाण्याचा दावा त्यांनी केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी विरोधी पक्षांनी अधिक ठामपणे लढा द्यावा, असे सांगितले. हा लढा अर्धवट सोडून चालणार नाही, असे नमूद करत त्यांनी २८ तारखेला मुंबईत ‘ज्ञानेश कुमार हटवा’ आंदोलनाची घोषणा केली.
काँग्रेसच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी संबंधित कथित जातीय भेदभावाच्या मुद्द्यावरही ॲड. आंबेडकर यांनी भाष्य केले. आर्थिक संपत्ती असूनही सामाजिक प्रतिष्ठेची हमी मिळत नाही, असे सांगत त्यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
समता आणि धर्मनिरपेक्षतेची भाषा करणाऱ्या काँग्रेसने आपल्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या सन्मानासाठी ठोस भूमिका घ्यायला हवी होती, असे ते म्हणाले. सामाजिक समतेच्या प्रश्नावर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतंत्र राजकीय वाटचालीचे आवाहन
बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायासाठी स्वतंत्र राजकारणाचे महत्त्व अधोरेखित केले होते, असे सांगत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना स्वतंत्र राजकीय वाटचालीचा विचार करण्याचे आवाहन केले. वंचित आणि शोषित घटकांनी आपल्या हक्कांसाठी संघटित होऊन संघर्ष सुरू ठेवावा, असेही ते म्हणाले.
या धम्म मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नतिकुद्दीन खतीब, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या अरुंधती शिरसाट, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र अध्यक्ष यू. जी. बोराडे, अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे राज्य कमिटी सदस्य, भन्ते गण आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. जी. वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

0 Comments