Rahul gandhi : 'पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि ज्ञानेश कुमारांना किंमत मोजावी लागेल' ; गोव्यातील सभेत राहुल गांधींचा हल्लाबोल

 Rahul gandhi : 'पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि ज्ञानेश कुमारांना किंमत मोजावी लागेल' ; गोव्यातील सभेत राहुल गांधींचा हल्लाबोल


गोव्यातील मडगाव येथील सभेत राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपांवरून नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा साधला. तसेच गोव्यातील जमीन व्यवहार, कथित भ्रष्टाचार आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून त्यांनी सरकारवर टीका केली.

Politics : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गोव्यातील मडगाव येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मतचोरीच्या आरोपांवरून काँग्रेस माघार घेणार नसल्याचा इशारा देतानाच, गोव्यातील जमीन व्यवहार, भ्रष्टाचार आणि तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नांवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. 

राहुल गांधी म्हणाले, “नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार यांना हे माहीत आहे की ते काँग्रेसपासून वाचू शकत नाहीत. आम्ही संविधानाचे रक्षक आहोत आणि संविधानाचे संरक्षण करणे हा आमचा धर्म आहे. मतचोरी करून संविधानावर आणि आपल्या हक्कांवर आक्रमण करण्यात आले आहे; मात्र आम्ही हे मान्य करणार नाही. मोदी, शहा आणि कुमारांना किंमत मोजावी लागेल'. 

पुढे गोव्यातील परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, 'गोवा हा देशातील सर्वात सुंदर प्रदेश असून, त्याची संस्कृतीही समृद्ध आहे. पण शेतकरी आणि गरीब लोकांकडून जमीन घेऊन ती बाहेरील लोकांना कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांत दिली जात आहे'.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यांमुळे गोव्यातील जमीन व्यवहार, कथित भ्रष्टाचार आणि मतचोरीच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. संविधानाचे संरक्षण आणि स्थानिक जनतेच्या हक्कांचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी केंद्र व राज्य सरकारला लक्ष्य केले.


Post a Comment

0 Comments

महाराष्ट्र राज्य | नाशिक | धुळे | नंदुरबार