धुळे : गोव्याचे खासदार तथा केंद्रीय ऊर्जा व नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मडगाव (गोवा)–धुळे रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे अधिकृत शिफारस केली आहे. धुळे रेल्वे स्थानकाचा टर्मिनस म्हणून विकास करून येथून थेट लांब पल्ल्याच्या रेल्वेसेवा सुरू करण्याच्या मागणीला यामुळे आता आणखी एक महत्त्वाचे राजकीय पाठबळ मिळाले आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी पंजाबमधील अमृतसर येथील खासदार गुरजितसिंग औजला यांनी अमृतसर-धुळे रेल्वेसेवेची मागणी केली होती, तर कोकणातूनही धुळेपर्यंत थेट रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे धुळे टर्मिनसची मागणी आता राष्ट्रीय स्तरावर अधिक ठळक होत असल्याचे चित्र आहे
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची मागणी…
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवून मडगाव–धुळे थेट रेल्वेसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव विचारात घेण्याची विनंती केली आहे. धुळे जिल्ह्यातील प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर व परवडणारी रेल्वे सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच गोवा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवासी, पर्यटक, भाविक व व्यापारी यांना थेट संपर्क मिळावा, यासाठी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देण्याची अपेक्षा पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. धुळे रेल्वे स्थानकाचा टर्मिनस म्हणून विकास व्हावा आणि येथून देशातील विविध भागांसाठी थेट रेल्वेगाड्या सुरू व्हाव्यात, यासाठी गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने मागणी सुरु आहे. सातत्याने होणाऱ्या पाठपुराव्यामुळे यापूर्वी अमृतसर- धुळे रेल्वेसेवेसाठी पंजाबमधून, तर कोकण- धुळे रेल्वेसेवेसाठी कोकणातूनही रेल्वे मंत्रालयाकडे शिफारसी करण्यात आल्या आहेत. आता गोव्यातूनही अधिकृत शिफारस झाल्याने धुळे टर्मिनसच्या मागणीला देशाच्या विविध भागांतून पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. या नव्या शिफारशीच्या अनुषंगाने रेल्वे मंत्रालय, मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डाकडे मडगाव- धुळे रेल्वेसेवा, धुळे स्थानकाचा टर्मिनस म्हणून विकास, पिटलाइन, वॉशिंग लाईन, रेक देखभाल केंद्र, स्टॅबलिंग लाईन, यार्ड पुनर्रचना आदी पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रस्तावाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून कालमर्यादित कार्यवाही अहवाल सादर करण्याचीही विनंती करण्यात आली आहे. धुळे रेल्वे टर्मिनसची मागणी आता केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित राहिलेली नसून, उत्तर महाराष्ट्राला कोकण आणि गोव्याशी जोडणाऱ्या संभाव्य रेल्वे दुव्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरत आहे. धुळे येथून थेट लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांचा विस्तार झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील प्रवासी, व्यापारी, उद्योजक तसेच पर्यटन क्षेत्राला मोठा फायदा होऊ शकतो. अमृतसर, कोकण आणि आता गोवा येथून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे धुळे स्थानकाला भविष्यातील प्रादेशिक रेल्वे केंद्र म्हणून विकसित करण्याच्या मागणीला नवे बळ मिळत असून ही मागणी लवकरात लवकर मंजूर झाल्यास मोठा लाभ होणार आहे.

0 Comments